Happiness depends upon ourselves.–Aristotle. Life begins where fear ends.

सेवानिवृत्ती विशेष! आदर्श व्यक्तिमत्व प्रा. श्री. प्रसाद कुलकर्णी

🌷🌷🌷 सेवानिवृत्ती विशेष!🌷🌷🌷

आदर्श व्यक्तिमत्व प्रा. श्री. प्रसाद कुलकर्णी


           आपल्या आयुष्यात येणाऱ्या काही व्यक्ती अशा असतात की , त्यांचा सहवास नेहमीच प्रेरणादायी असतो. असच एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे प्रा. प्रसाद दिगंबर कुलकर्णी. विद्यार्थीप्रिय उपक्रमशील शिक्षक, यशस्वी जेष्ठ पत्रकार तसेच शिक्षण, कला - क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील क्रियाशील सहभागातून स्वतःचा ठसा उमटवणारे  सर दि. 30 एप्रिल रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या आजवरच्या कार्याचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न..
         सह्याद्री पॉलिटेक्निक, सावर्डे येथे ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग विभाग प्रमुख म्हणून सेवा बजावल्यानंतर लांजा तालुक्यातील श्रीराम विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे 1990 साली पूर्णवेळ सहाय्यक शिक्षक म्हणून प्रा. कुलकर्णी रूजू झाले. विद्यार्थ्यांना तालुक्यामध्ये व्यावसायिक शिक्षण देणारे हे पहिले विद्यालय असल्याने एका अर्थाने सर व्यावसायिक शिक्षण देणारे तालुक्यातील पहिले पूर्णवेळ शिक्षक ठरले आहेत. त्यांनी दै. तरुण भारतच्या माध्यमातून सोळा वर्षे अव्याहतपणे  पत्रकारिता क्षेत्रात काम केल्याने सजग पत्रकार म्हणून नावलौकिक मिळवला आहे.
            महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृसिंहवाडी, ता. शिरोळ हे त्यांचे मूळ गाव असून ते डिप्लोमा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग व डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये यश मिळवून निसर्गरम्य कोकणात शिक्षक म्हणून कार्यरत झाले. आपल्या 30 वर्षाच्या सेवा कालावधीत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून आपल्या कॉलेजचा नावलौकिक वाढवत विद्यार्थाना व्यावसायिक शिक्षणासाठी जे उत्तमोत्तम देता येईल याचा नेहमी सकारात्मक विचार केला. वाहन निर्मिती करणाऱ्या तसेच विक्री पश्यात वाहनांची देखभाल व दुरुस्ती करणाऱ्या ऑथोराईज्ड डीलर कडे विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले.
        सरांचे विदयार्थी मुंबई ,पुणे ,कोल्हापूर सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथे सेवारत आहेत. आज लांजा शहरातील महामार्गावर ऑटोमोबाईल वर्कशॉपच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी स्वयं रोजगार करत आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थी स्वतःच्या यशामध्ये सरांचेही योगदान बहुमोल असल्याचे आवर्जून सांगतात. स्वतः पत्रकार असल्याने त्यांनी भविष्याचा वेध घेत विद्यार्थ्यांना घडविताना विविध प्रकारचे उपक्रम संस्था, प्रशाला व सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हाती घेतले व यशस्वीपणे पूर्ण केले. आपल्या विद्यार्थाना अद्ययावत ज्ञान प्रात्यक्षिकासह मिळण्यासाठी वर्कशॉप आयोजन, ऑटोमोबाईल क्षेत्राशी संबंधित व्याख्याने, ड्रायव्हिंग
लायसन्स बाबत मार्गदर्शन, मुंबई - पुणे येथील विविध प्रशिक्षणे, ऑटोमोबाईल संदर्भातील घडामोडींवर चर्चा सत्रे, आदी उपक्रमात सातत्य राखले.
          सजग पत्रकार आणि उपक्रमशील शिक्षक अशी सरांची अल्पावधीत ओळख झाल्याने राष्ट्रीय कामांसह अन्य सामाजिक उपक्रमातील त्यांचा सहभाग सतत वाढत राहिला. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान समिती, महात्मा गांधी तंटामुक्त मोहीम, लांजा तालुका कबड्डी असोसिएशन, एच. एस. बोर्ड कोल्हापूर येथील व्यावसायिक शिक्षण चर्चासत्र यामध्ये महत्वपूर्ण कामगिरी बजावली.


          प्रा. कुलकर्णी 
यांनी केलेल्या कामाची दखल सामाजिक संस्थांनी घेतली आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालायमार्फत देण्यात येणारा रत्नागिरी जिल्हा उत्कृष्ट युवा पुरस्कार, महाराष्ट्र पत्रकार संघ पत्रकाररत्न पुरस्कारने तसेच शैक्षणिक व सामाजिक उपक्रमातील योगदानाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. आजवर त्यांनी अमोल कला मंच, लांजा, नेहरू युवा ऑल मूव्हमेंट ऑर्गनायझेशन, लांजा, अमोल रंगायत्री लांजा, लांजा तालुका टू- व्हीलर असोसिएशन लांजा (संस्थापक अध्यक्ष),  स्वरधारा संगीत मंच लांजा, साप्ताहिक सूर्यकिरण(उपसंपादक) यांमध्ये आपले योगदान दिले आहे.
        आजवर सरांनी विविध विषयांवर व्याख्याने, स्पर्धांची परीक्षणे केली आहेत. शास्त्रीय व तंत्रशास्त्रीय पुस्तक लेखनाचे काम कठीण मानले जाते. ते आव्हानही त्यांनी स्वतःच्या मेकॅनिकल टेक्नॉलॉजी या
पाठ्यपुस्तक निर्मितीतून लीलया पेलले आहे. आजच्या तंत्रशास्त्रीय शिक्षणासाठी हे पुस्तक दिशादर्शक ठरत आहे.
        शिक्षणासाठी वाहून घेतलेले कर्तव्यनिष्ठ सर आज शिक्षक म्हणून सेवानिवृत्त होत आहेत. भविष्यात त्यांनी निश्चित केलेल्या योजना, संकल्पसिध्दीस जावोत या सदिच्छेसह  मनःपूर्वक शुभेच्छा!!


- श्री. प्रकाश हर्चेकर, लांजा

No comments: