Worth of Reading...

जपानी जिद्दीची गोष्ट
          एकदा काय झालं… एकदा नाही हो, बऱ्याचदा काय झालं, की जपान्यांना त्यांचे आवडते मासे मिळेनात. म्हणजे जपानी लोकांना कच्चे मासे खायला आवडतं, हे तर तुम्हाला ठाऊक आहे. “सुशी’ या सोज्वळ नावानंही जपानी डिश लोकप्रिय आहे; तर किनाऱ्याजवळच्या समुद्रात मासेमारी केल्यानं “सुशी’साठी लागणारे मासे संपले. म्हणजे जपानी कोळी जाळीबिळी टाकायचे; पण त्यात सुशीयोग्य मासे सापडायचे नाहीत. आता काय करायचं? त्यांनी उपाय शोधला. मोठ्या बोटी घेऊन ते समुद्राच्या आतल्या भागात गेले. तिथे “सुशी’ सापडले. मग काय? पकडले आणि आणले! पण गंमत अशी झाली, की बोटी किनाऱ्यापासून दूर गेल्यामुळे त्यांना परत यायला वेळ लागे. तोपर्यंत “सुशी’ मासे मरून जात. मग त्या माशांच्या मासामध्ये ती गंमत येत नसे. आता काय करायचं? मग त्यांनी ठरवलं. दूर समुद्रात जाणाऱ्या बोटीत आपण “फ्रिझर्स’ ठेवू. त्यात माशांना बंद करू. किनाऱ्यावर पोचलो. त्यांना पुन्हा वॉर्मअप करू की सुशी तय्यार. झालं, तो प्रयोग यशस्वी झाला. मासे अगदी फ्रेश राहू लागले; पण फ्रिझरमध्ये ठेवलेले मासे आणि ओरिजनल सुशी यात फरक होता. तेव्हा फ्रिझरची आयडिया अगदी व्यावहारिक; पण मत्स्यप्रेमींनी नाकं मुरडली. आता काय करायचं? पण जपानी लोक डोकेबाज. त्यांनी काय केलं? त्या मोठमोठ्या बोटींवर मोठाले टॅंक बांधले. त्या पाण्यात मासे सोडायचे आणि जिवंत आणायचे. किनाऱ्याला लागले, की टॅंकमधून बाहेर. सुशी तय्यार! वा! सुशीच्या डिश जपानी रेस्टॉरंटमधून मिळू लागल्या. पण गुणवत्तेच्या बाबतीत चोखंदळ जपान्यांनी आपली इवलीशी नाकं मुरडली. जिवंत माशांची सुशी बरी लागली खरी; पण त्या टॅंकमध्ये दाटीवाटीनं राहणाऱ्या माशांत तसा दम नव्हता. त्यांच्या हालचाली मंदावलेल्या. त्यांची तोंडं मरगळलेली. ओरिजनल सुशी ती ओरिजनल सुशी, हो की नाही मिस्टर सुझुकी? हो! अगदी खरं मिस्टर यामा टोमो! किंवा मि. यामोटोमा!! आता काय करायचं? जपानी कोळी लई हिकमती मानूस. तो काय असा डगमगनारा न्हवेच! त्यानं डोकं खाजवलं, विचार केला आणि अखेर एक शक्कल सुचली. शक्कल म्हणजे भारी अक्कल असल्याशिवाय शक्‍यच नाही. त्यांनी बोटीवरील टॅंकचा अभ्यास केला. टॅंकमधले मासे मरगळतात का? मंदावतात का? त्यांच्या वावरण्यात जोम का राहत नाही? त्यांच्या हालचालींतील जोश का हरवतो? जपानी गडी रिसर्चमध्ये एकदम हुश्‍शार बरं. हार खाणारा नव्हे! सुशी खाल्ल्याचा परिणाम दुसरं काय? बरं, युक्ती नामी. त्यांनी? काय केलं त्या टॅंकमध्ये माशांमध्ये जिवंतपणा, जोश व जोम टिकविण्यासाठी काही शार्क मासे सोडले. झालं! या शार्क माशांच्या तडफदार आणि झटपट हालचालींमुळे इतर माशांना पळता भुई! सॉरी पोहता पाणी अपुरं पडू लागलं. साऱ्यांना एकच धास्ती, या शार्कपासून कसा बचाव करायचा? बोटी किनाऱ्याला लागेपर्यंत सगळे मासे ताजेतवाने, तरतरीत आणि तडफदार राहू लागले! जपानी लोकांना अगदी हव्वी तश्‍शी ताजी सुशी मिळू लागली!! जपानी लोक खूश झाले. मित्रहो, या गोष्टीत तुम्हाला एक ठाम बाजू घ्यावी लागेल. म्हणजे तुम्ही माशांच्या बाजूचे की माणसांच्या? माशांच्या बाजूचे असाल, तर त्यांच्या “सकाळ’मध्ये “माणसांच्या क्रूरपणाची कमाल’ अशा शीर्षकाखाली इथल्या प्रसंगाचं रिपोर्टिंग होईल. तुम्ही माणसांच्या बाजूचे, सुशीप्रेमी मत्स्याहारी असाल तर कधी एकदा सुशी खातोय, असं तुम्हाला वाटेल. तुमच्या लेखी माणसाच्या मर्मभेदी संशोधनाची आणि अक्कलहुशारीची गोष्ट ठरेल. पैकी कोणाचीही बाजू घ्यायची नसेल, तर उत्तम. कारण ही गोष्ट ना माशांची, ना माणसांची आहे; माणसामधल्या तडफदारीची. तुम्हाला जीवनातला जोश टिकवायचा आहे. तुम्हाला सळसळत्या उत्साहानं जगायचंय? तुम्हाला जोमानं जीवनाचं आव्हान स्वीकारायचंय? तर मग तुम्हाला बंदिस्त राहून चालणार नाही. अहो, इथे थांबला तो संपला. मनातली जिगर टिकवायची असेल, तर स्पर्धेला घाबरू नका. आपल्यापेक्षा बलाढ्य शत्रूशी लढा देण्यात खरी मर्दुमकी आहे. त्या शत्रूबरोबर दोन हात करण्यात, गनिमी काव्यानं लढण्यात खरी गंमत असते. अशा लढाईत आपल्या शौर्याचा आणि हिमतीचा कस लागतो. अशा सामन्यात आपण बुद्धी, शक्ती व युक्तीची शस्त्रं पारजून ठामपणे लढतो. स्पर्धेचं आणि शर्यतीचं वातावरण आज सर्वत्र दिसतंय. चढाओढीच्या धुंदीनं आज सारे नादावलेले आहेत. या सर्वांना आपण पुरून उरणार आहोत. कदाचित, त्या जपान्यांनाही पुरून उरू आणि भारतीय आर्थिक सत्तेचा झेंडा जगभर फडकू लागेल. अर्थात, त्यासाठी चिकाटी, संशोधक वृत्ती हवी, हार न मानण्याची प्रवृत्ती हवी. मग काय आहात ना तय्यार! आणि अखेर गोष्ट वाचल्याबद्दल थॅंक्‍यू, धन्यवाद, आभारी आहे, शुक्रिया नाही नाही आरिगातो गोजायमास. – डॉ. राजेंद्र बर्वे मानसोपचारतज्ज्ञ, मुंबई

Post a Comment

0 Comments